Govinda Joins Eknath Shinde’s Shiv Sena:
एकेकाळचा कॉमेडी किंग अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात आपलं नशीब अजमावू पाहत आहे. आज गुरुवारी दिनांक 28 मार्च 2024 रोजी त्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याप्रसंगी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोविंदा यांची त्यांच्या निवासस्थानी मिटिंग झाली होती. त्या नंतर बरेच अंदाज बांधले जात होते. गोविंदाची राजकारणात पुन्हा एकदा एंट्री होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आणि आज त्याने पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश सुद्धा केला आहे.
या प्रसंगी गोविंदाने सांगितले कि, “मी 2004 ते 2009 या काळात राजकारणात होतो आणि ती 14वी लोकसभा होती. आज 14 वर्षांनंतर मी पुन्हा राजकारणात आलो हा एक विलक्षण योगायोग आहे.“
“गोविंदाला प्रगतीची आस आहे. मोदीजींच्या विकास धोरणांनी तो प्रभावित झाला आहे. त्याला चित्रपटसृष्टीच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी काहीतरी करायचे आहे. मला खात्री आहे की तो सरकार आणि चित्रपट उद्योग यांच्यातील दुवा ठरेल. तो कोणत्याही अटी न लावता आमच्यात सामील झाला आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी ठामपणे सांगितले.
गोविंदाची राजकारणातील पूर्वीची कारकीर्द :
यापूर्वी 2004 मध्ये गोविंदाने काँग्रेस कढून निवडणूक लढविली होती त्यात त्याने दिग्गज नेते राम नाईक यांचा पराभव करून भाजपाला मोठा धक्का दिला होता. त्याबद्दल त्याला ‘जायन्ट किलर’ असेही संबोधले गेले होते. हा राजकारणातील खूप मोठा क्षण होता गोविंदासाठी.
पण नंतर काही कारणास्तव गोविंदाने काँग्रेस पार्टी सोडून पुन्हा सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. 2006 मध्येच त्याने सिनेसृष्टीत कमबॅक केला. ‘भागम भाग’ या कॉमेडी चित्रपटा पासून त्याने पुन्हा एकदा ऍक्टिंगच्या कामास सुरुवात केली.