कमीत कमी देखभाल करून तुम्ही तुमच्या घरात निसर्गाची हिरवळता कशी आणू शकता याचा विचार करत आहात?
तुमच्या घरात हिरवळ आणण्यासाठी आणि तुमच्या घराला नैसर्गिकरित्या ताजतवानं ठेवण्यासाठी आम्ही (5 Best indoor plants) 5 सर्वोत्तम इनडोअर वनस्पतींची यादी घेऊन आलो आहोत.
1. स्नेक प्लांट(Snake Plant): ही एक अशी वनस्पती आहे ज्याची देखभाल खूप कमी आहे आणि कमी सूर्यप्रकाशात आणि कोरड्या मातीच्या प्रकारात देखील वाढते. दिसायला खूप आकर्षक असून याची पाने उभी वाढतात अगदी सापासारखी, म्हणून तर याला स्नेक प्लांट म्हणतात.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते रात्री कार्बन डायऑक्साइड शोषून घेते, तसेच हवेतील इतर विषारी वायू देखील शोषून घेतात. तुमच्या घराची हवा ताजी आणि मोहक ठेवते. पाणी सुद्धा कमी घालावा लागतं, आणि एक काळजी नक्की घ्या कि या झाडाला जास्त पाणी घालून चालत नाही कारण याची मुळे कुजण्याची शक्यता असते.
2. मणी प्लांट ( Money Plant): याची पाने खूपच मनमोहक असतात. थोडी मोठी व विड्याच्या पानाच्या आकाराची आणि पैश्यासारखी दिसणारी किंवा वाटणारी म्हणून याला मनी प्लांट संबोधलं जात.
असा विश्वास आहे कि हे झाड घरात असेल तर तुमच्या घरात पैशाची कधी उणीव भासणार नाही व तुमची इन्व्हेस्टमेंट वाढत जाऊन तुम्हाला लक्ष्मी कृपा मिळत जाते. याला वास्तुशास्त्रात हि खूप महत्व आहे. शक्यतो याला घराच्या पूर्व दिशेला कमी सूर्यप्रकाशात ठेवावे. आठवड्यातून २ ते ३ वेळा जरी पाणी घातल तरी पुष्कळ आहे. समजा एकदा जरी घातल तरी हे झाड खूप छान वाढतं. माती मोकळी आणि भुसभुशीत ठेवावी म्हणजे पाण्याचा निचरा होऊन जाईल.
3. जेड प्लांट (Jade Plant): याला जेड प्लांट किंवा लकी प्लांट असही म्हणतात. अशी श्रद्धा आहे कि हे झाड त्याच्या घरातील लोकांसाठी भाग्य आणि भरभराट घेऊन येत. यामुळे नातेसंबंध आर्थिक परिस्थिती चांगली राहून सुधारण्यास मदत होते अशी मान्यता आहे. त्यामुळे याला काही लोक फ्रेंडशिप ट्री(Friendship Tree) आणि मनी ट्री(Money Tree) या नावानेही ओळखतात.
अत्यंत कमी देखभाल व अगदी कमीत कमी पाण्यात सुद्धा हे वाढत. पाणी घालताना स्प्रे करून घातल तर उत्तम. हिवाळ्यात महिन्यातून एकदा व उन्हाळ्यात दर आठवड्याला थोडं थोडं पाणी घालावे. जास्त पाणी घातल तर झाडाची पाने गळायला लागून झाड मारू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे याला खिडकी जवळ ठेवावे हवेशीर ठिकाणी म्हणजे वाढ आणि संगोपन छान होते.
4. फर्न ट्री ( Fern tree): याला पृथ्वीवरील वनस्पतींच्या सर्वात जुन्या प्रजातींपैकी एक म्हणून संबोधले जाते. ही एक अशी वनस्पती आहे जी मनुष्याच्या जन्मापूर्वी पासून पृथ्वीवर वाढत आहे अशी मान्यता आहे.
या झाडाला आर्दता लागते त्यामुळे शक्यतो याला मातीच्या ऐवजी प्लास्टिक कुंड्यांमध्ये लावावे जेणेकरून आर्दता बनून राहील. कमी सूर्यप्रकाशात उत्तरेला किंवा पूर्वेला या झाडास ठेवावे आणि फॅन खाली अजिबात ठेवू नका कारण यातील आर्दता निघून जाते व झाड वाळून जाण्याची शक्यता असते.
वातावरणातील प्रदूषके दूर करण्यासाठी आणि मातीतून जड धातु जसे कि अर्सेनिक काढण्यासाठी या झाडाची खूप मदत होते. नक्की लावून पहा कारण यामुळे घराची शोभा खूपच वाढते. पाणी खूप कमी घाला व याच्या मातीत सेंद्रिय खताचा वापर करा. पाण्याचा निचरा होईल असा राहू द्या. जास्त पाणी घातल्याने पाने पिवळी पडू शकतात. याची काळजी घ्या.
5. पीस लिली (Peace Lily): आपल्या आयुष्यात आपण सर्वात जास्त अपेक्षा कशाची करतो तर आंतरिक शांती आणि आत्मिक आनंद. या झाडाची हिरवीगार पाने आणि पांढरे शुभ्र नागाच्या फण्यासारखी फुले तुम्हाला नक्की शांत वातावरणाची प्राप्ती करून देतील.
यांच्या फुलातून सौम्य असा सुवास दरवळतो ज्यामुळे वातावरण शुद्ध आणि सुवासिक होते. हे झाड पाहून खूप समाधान आणि शांतता भासते. याच्या वाढीसाठी सौम्य वातावरण लागते. कमी सूर्यप्रकाश किंवा सावलीतही हे झाड वाढू शकते. पाणी प्रमाणात घालावे जेणेकरून आर्दता बनून राहील व निचराहि होऊन जाईल याची काळजी घ्यावी. खूप प्रखर सूर्यप्रकाशात ठेवले तर पाने करपून जाण्याची शक्यता असते.
तर नक्की हि झाडे तुम्ही तुमच्या घरात लावून पहा व निसर्गाचा अनुभव घरातून घ्या. आपण निसर्गाची काळजी घेतली व त्याच्याशी जवळीक ठेवली कि तोही आपल्याला जवळ करतो व उत्तम परिणाम देऊन आपले आयुष्य उज्ज्वल करून टाकतो.